२१ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आंदोलनाला अखेर मंगळवारी अर्धविराम

रायगड माझा वृत्त 

परळी वैजनाथ- मराठा आरक्षण व मेगा भरती स्थगिती या प्रमुख मुद्द्यावर परळी येथे गेल्या २१ दिवसांपासून सातत्याने सुरू झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आंदोलनाला अखेर मंगळवारी अर्ध विराम मिळाला आहे. उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या झालेल्या सुनावणीवेळी मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदर राखत परळीतील हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर १ डिसेंबरपासून पुन्हा परळीतील याच मैदानातून आंदोलन सुरू होईल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून राज्यातील मेगा नोकरभरती करावी या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय कार्यालया वर १८ जुलै रोजी ठोक मोर्चा काढण्यात आला होता.

त्यानंतर या आंदोलनाने नाट्यमय वळण घेत ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन विसर्जित करायचे नाही ही भूमिका घेण्यात आली. गेल्या २१ दिवसांपासून आंदोलनकर्त्यांनी तहसील परिसर सोडलेला नव्हता. ठोस निर्णायक लेखी आश्वासन मिळेपर्यंत परळीतील मराठा आंदोलन विसर्जित होणार नाही या घेतलेल्या भूमिकेवर आंदोलनकर्ते आजही सायंकाळपर्यंत ठाम होते. यावर तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले, परंतु जे लेखी स्वरूपात

निवेदन शासनाच्या वतीने देण्यात येत होते त्यावर आंदोलकाचे समाधान होत नव्हते. मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा हालचाली वेगाने सुरू झाल्या. त्यातच मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. विशेष सरकारी वकील रवी कदम यांनी सुनावणीदरम्यान अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे, असे सांगितले आहे. तसेच मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली.

परळीतील आंदोलनाने क्रांती घडवली : पाटील 
परळीतून मराठा आरक्षणासंबंधी एक ऐतिहासिक व निर्णायक परिवर्तन सुरू झाले. परळीतील २१ दिवसांचे आंदोलन हे अतिशय शिस्तबद्ध व लोकशाही मार्गाने मराठा समाज बांधवांनी यशस्वी केले. आपल्या प्रमुख तीन मागण्या होत्या. त्या सर्वच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे ठोस व निर्णायक लेखी आश्वासन सरकारने आपल्याला दिले. त्याचबरोबर उच्च न्यायालयानेही यासंबंधी सरकारला निर्देश दिले असून आरक्षणाला टाईम बॉण्ड दिला आहे. ज्या प्रमुख मागण्या घेऊन आपण हे आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाला यश आले अाहे. परळीतून सुरू झालेले हे आंदोलन मराठा आरक्षणा बाबत क्रांती घडविणारे आंदोलन ठरले आहे, असे मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत