२५ हजारांची लाच घेताना आरोग्यसेविकेस पकडले

संभाजीनगर : रायगड माझा ऑनलाईन 

बोरगाव सारणी येथील आरोग्यसेविकेस २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सिल्लोड येथे पकडले.

सुनीता किसन चंडोल (३९) या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारणी येथे आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदारास आरोग्यसेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ५ लाख रुपयांची त्यांनी मागणी केली. त्यातील ४ लाख ७० हजार रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा मेगाभरतीमध्ये आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमार्फत आरोग्यसेवक पदावर नोकरी लावून देण्यासाठी आणखी २५ हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार सुनीता किसन चंडोल यांच्याकडे पंच साक्षीदारांसमक्ष तक्रारदारांना पाठवून लाचेची मागणी करण्याबाबत पडताळणी केली असता २५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवार, १२ रोजी सुनीता चंडोल यांना पंच साक्षीदारांसमक्ष २५ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम घेताना सिल्लोड येथील पंचायत समितीसमोर डीडीओ कार्यालयाजवळ रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोहेकाँ गणेश पंडुरे, विजय बाह्मंदे, पो.ना. रवींद्र अंबेकर, सुनील पाटील, महिला पोलीस निर्मला सुपारे यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत