३० जणांचा जीव घेणारी बस आंबेनळी घाटातून काढली बाहेर

पोलादपूर : सिद्धांत कारेकर

३० जणांना मृत्यूच्या कवेत घेऊन ८०० फूट खोल घाटात झेपावलेली बस अखेर बाहेर काढण्यात आलीये. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बसला बाहेर काढण्यात आलंय. 28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पोलादपूर आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत कोसळली होती.

दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज ही बस दरीतून बाहेर काढण्यात आली. आज सकाळी 7 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने बस काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

बस दरीत अडकल्यामुळे पोलिसांचा तपास पूर्ण होत नव्हता तसंच एस टी परिवहन खात्याचा तपास अपूर्ण राहिला होता. आता बस दरीतून काढण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी रायगड आरटीओ, फॉरेन्सीक विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.  बसची पाहणी केल्यानंतर अपघात कशामुळे झाला या तपासातून पुढे येणार आहे.

बस जेव्हा दरीतून बाहेर काढण्यात आली तेव्हा या बसचा फक्त सांगाडा बाहेर आला. बसचे छत पूर्णपणे निखळले होते. बसची कंडक्टरची केबिन आणि मागचा भाग पूर्णपणे तुटलाय. बस काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली तेव्हा घटनास्थळी बस अपघातील मृतांचे नातेवाईकही हजर होते.

परंतु ही बस कोण चालवत होता. ३० जणांचा मृत्यूला कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून , मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मात्र बस अपघातातून बचावलेले प्रकाश सवांत देसाईच हे बस चालवत असावेत असा संशय व्यक्त केला. देसाईंची सखोल चौकशी होऊन दोषी असतील तर त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत