९५ वर्षीय यंगस्टारची कोरोनावर यशस्वी मात

पनवेल: साहिल रेळेकर

अवघ्या १४ दिवसांच्या उपचारानंतर कळंबोलीतील कोविड सेंटर मधून डिस्चार्ज

खांदा वसाहतीतील ९५ वर्षीय पोहरी सिंग कोरोनावर मात करून सुखरूप परतले

कोरोनाची लागण झाल्यास खचून न जाता मनोधैर्य वाढवण्याचे आवाहन

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. कोरोनाचा आलेख चढता असून लोकांमध्ये देखील कोरोनाबाबत भीती पसरत आहे. कोरोना रोगाच्या संक्रमणापेक्षा कोरोनाच्या भीतीनेच नागरिकांची मानसिक स्थिती खालावत चालली असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असे असले तरीही कळंबोली मधील कोविड सेंटर मधून गुरुवारी रात्री एका ९५ वर्षीय पोहरी सिंग नामक वयोवृध्द व्यक्तीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या दरम्यान अवघ्या १४ दिवसांत योग्य ते उपचार घेतल्यानंतर त्यांना कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सदर वयोवृद्ध व्यक्तीचा ८ एप्रिल रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना कळंबोली मधील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर १४ दिवसांच्या उपचारानंतर कळंबोलीतील कोविड सेंटर मधून ९५ वर्षीय पोहरी सिंग हे कोरोनामुक्त होऊन घरी जात असताना त्याठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

एकीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना बाबत सातत्याने नागरिकांमध्ये होत असलेल्या उलटसुलट चर्चेमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरत आहे. प्रसंगी भीतीपोटी काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यास योग्य उपचारानंतर सुधारणा होऊन कोरोना पूर्णपणे बरा होत आहे. म्हणूनच कोरोना संसर्ग झाल्यास घाबरुन न जाता सरकारने खबरदारी च्या दृष्टिकोनातून आखून दिलेल्या निर्बंधांचे व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियमावलीचे तंतोतंत पालन करुन स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आजच्या घडीला जर पोहरी सिंग हे ९५ वर्षीय वयोवृध्द व्यक्ती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कोरोनावर मात करु शकतात तर सर्वांनी आपल्या मनातील भीती काढून मनोधैर्य वाढवल्यास शंभर टक्के कोरोना पूर्णपणे बरा होऊ शकतो यात तिळमात्रही शंका नाही असे आवाहन करण्यात येत आहे. ९५ वर्षीय पोहरी सिंग यांना डिस्चार्ज दिल्यानंतर घरी परतताना त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी नगरसेवक रवींद्र भगत यांच्यासह आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत