🔴 भारत बंद Live : इंधन दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी!

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने बंदला पाठिंबा दिलेला नाही. तर मनसेने मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

या पक्षांचा पाठिंबा
‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

एसटीच्या जादा गाडय़ा दुपारनंतर
‘भारत बंद’मुळे गणेशोत्सवानिमित्त घोषित केलेल्या एसटीच्या विशेष बसगाडय़ा सोमवारी सकाळऐवजी दुपारी ३ नंतर सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

__________________________________________________________________________________________

दुपारी १.१५ । इंधन दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी!

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचा निषेध करत आज काँग्रेसने देशव्यापी बंदची हाक दिली. शिवसेनेनेही सामनातून पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करत सरकारवर टीका केली. तर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या बंदला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. देशात आणि महाराष्ट्रात या बंदला प्रतिसाद मिळत असताना राज्याचे सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात आले होते.

सकाळी : १२.१५ । सिद्धिविनायक मंदिराबाहेर मनसैनिकांची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

सिद्धिविनायक मंदिरात पोस्टल स्टॅम्पच्या प्रकाशनासाठी पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांविरोधात मंदिराबाहेर मनसैनिकांनी घोषणाबाजी केली.

 

सकाळी ११.१० । भारत बंदचा नारा देत वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी अंधेरी येथे मेट्रो ट्रेन रोखली.
सकाळी ११.०० । अशोक चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नेते माणिकराव ठाकरे, संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सकाळी : १०.५० । मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने मुंबईत रेल रोको आंदोलन केले. 
त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
सकाळी : १०.४५ । मुंबईत काँग्रेसच्या रॅलीची जोरदार सुरुवात!
मालवणीत काँग्रेसच्या रॅलीची जोरदार सुरुवात. नगरसेवक वीरेंद्र चौधरी, माजी नगरसेवक सिराज शेखसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. तसेच सिपीएमचे कार्यकर्तेही लाल झेंडे घेत सहभागी. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक.
सकाळी : १०.२० । भांडूपमध्ये मनसेचं रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलन
सकाळी १०.१५ । गुजरातमध्ये बंदला हिंसक वळण, वाहतूक थांबवण्यासाठी जाळण्यात आले टायर्स

सकाळी : १०.०५ । राहुल गांधी राजघाट येथे दाखल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजघाट येथे दाखल झाले असून, तेथूनच काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

सकाळी : ९.३० । एपीएमसी मार्कटवर परिणाम नाही

भारत बंदचा नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटवर कोणताही परिणाम झालेला नसून नेहमीप्रमाणे व्यवहार सुरु आहे

सकाळी : ९.१५ । पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी फोडली बस
सकाळी : ८.३० । जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये – उद्धव ठाकरे

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. या बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला असून शिवसेना मात्र बंदमध्ये सहभागी झालेली नाही. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून बंदवर भाष्य करताना जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये असं म्हटलं आहे.

सकाळी : ८.२० । भुवनेश्वरमध्ये आंदोलनाला सुरुवात

सकाळी : ८.२० । संजय निरुपम यांना आंदोलनाआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. दरम्यान आंदोलन सुरु होण्याआधीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी संजय निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

सकाळी : ८.१५ । पुण्यात बंदला हिंसक वळण

इंधन दरवाढीविरोधातील भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करण्याची सूचना केल्यानंतरही कार्यकर्त्यांनी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी बस फोडली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत