’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन  

सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सध्या ’10 Year Challenge’ ची क्रेझ आहे. या हॅशटॅगद्वारे युजर्स त्यांचा 10 वर्षापूर्वीचा फोटो आणि सध्याचा फोटो शेअर करत आहेत. 10 वर्षानंतर आपल्या चेहऱ्यात किती बदल झाले, हे अनुभवण्यासाठी हे चँलेज सुरू आहे. या हॅशटॅगद्वारे 50 लाख यूजर्सने आपले 10 वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो शेअर केले आहेत. त्यात सेलिब्रिटींसह अनेक मान्यवरही आहेत. मात्र, या चँलेजमागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अनेकांनी याबाबत संशय व्यक्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तंत्रज्ञ लेखक केट ओ नील यांनी या चँलेजबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एमआय मॅकेनिजम तंत्रज्ञान ही चेहरा ओळखण्याची पद्धती आहे. या पद्धतीची चाचणी घेण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी किंवा त्या तंत्रज्ञानाच्या यशाचा आढावा घेण्यासाठी हे चँलेज सुरू करण्यात आले आहे काय असा सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे. त्यांनी हा सवाल उपस्थित केल्यानंतर या चँलेजमागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेस रिकग्नेशन अल्गोरिद्म अपडेट करायचे असल्यास अनेक जुन्या आणि नव्या फोटोंची गरज भासते. तसेच हे फोटो मिळाल्यावर त्यांच्या वयातील अंतर माहीत असणेही गरजेचे असते. या चँलेजमध्ये तसेच 10 वर्षांचे अंतर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक फोटो आणि त्यातील अंतर सहज कळते, असेही केट यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या चँलेजवरून वादाला तोंड फुटल्यावर या चँलेजमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. हे यूजर्सने सुरू केलेले चँलेज आहे. या चँलेजमध्ये मजा, मस्ती आणि गमतीचा भाग आहे. फेसबुकच्या या स्पष्टीकरणानंतरही अनेकजणांनी केट यांनी वर्तवलेली कटाच्या शक्यतेत तथ्य असल्याचे म्हटले आहे. याआधीही फेसबुककडून डेटा लीक आणि डेटा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे युजर्सने विचार करूनच कोणत्याही चँलेजमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत