वाघिणीला मारण्याऐवजी बेशुद्ध करायला हवं होतं: राज ठाकरे

रायगड माझा वृत्त :

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या वाघिणीला आधी बेशुद्ध करायला हवं होतं. अवनी वाघिणीच्या शिकारीच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतली आहे. फक्त पुतळे बांधून वाघाचं संरक्षण होत नाही. जिथे वाघाला मारण्यात आलं तिथून साठ किमी अंतरावर अनिल अंबानींचा प्रकल्प येतो आहे असे समजते आहे. सरकारने अनिल अंबानीला देश विकायला काढला आहे का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे.

राज ठाकरेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही निशाणा साधला. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असले म्हणून त्यांना जंगलातलं आणि वन्य प्राण्यांच्याबाबतीतलं सगळं कळतं असं नाही. अवनी वाघिणीच्या शिकारीसंदर्भात ते अत्यंत बेफिकिरीने उत्तरे देत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला. वाघाची जमात दुर्मीळ होत चाललेली जमात आहे त्याचे संवर्धन करायचे सोडून शिकार कसली करता?  देशात यांची सत्ता आहे, महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवर मोदींचा हात आहे. त्यांना माज आहे म्हणून यांनाही माज आला आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

उद्योगपतींनी जमीन हवीच असेल तर देशात अनेक ओसाड भागांमध्ये जमिनी आहेत. जमिनी मिळवण्यासाठी जंगलात शिरण्याची गरजच काय? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. एवढंच नाही तर सरकारला फक्त पुतळे उभे करण्यातच स्वारस्य आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला. आता मेलेल्या वाघिणीचाही पुतळा उभारा असाही टोला राज ठाकरेंनी लगावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत