154 PSI नियुक्ती रद्द: हायकोर्टाच्या पर्यायाचा विचार करु: मुख्यमंत्री

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त

नियुक्ती रद्द झालेल्या अनुसूचित जाती जमातीतील 154 पीएसआय प्रकरणी हायकोर्टात जायचं की दुसरा मार्ग काढायचा याबाबत आमचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

नियुक्ती रद्द झाल्याने मॅटने 154 पीएसआयना त्यांच्या मूळ पदावर पाठवलं आहे. त्यामुळे 9 महिन्यांचं प्रशिक्षण घेऊनही या पीएसआयना आता मूळ पदावर जावं लागलं. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “मॅटचा निर्णय आला आहे. पण राज्य सरकार त्यातून मार्ग काढत आहे. कारण या पीएसआयनी ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे मी विधी व न्याय विभागाला सांगितलं आहे. त्यामुळे हायकोर्टात आव्हान द्यायचं की दुसरा मार्ग काढायचा याबाबतचा आमचा प्रयत्न सुरु आहे”.

काय आहे प्रकरण?

पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखली आहे. तसंच या सर्वांना त्यांच्या मूळ जागी नियुक्त करावं किंवा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्याचा आदेशही मॅटने दिला आहे. या निर्णयामुळे प्रशिक्षण पूर्ण करुन नियुक्तीसाठी उत्सुक असलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये निराशा पसरली आहे. सरकारने 828 पोलीस उपनिरीक्षक अर्थात फौजदारांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ही भरती करण्यात आली. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी नाशिकमध्ये पाठवण्यात आलं. परंतु ही पदं भरताना पदोन्नतीमधील आरक्षण लागू केल्याचा दावा करत मंदार पाटील, संतोष राठोड, एम.एस. राडीये यांच्यासह सव्वाशे उमेदवारांनी मॅटमध्ये आव्हान दिलं होतं.

या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करतानाच, सरकारचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारा असल्याचंही या उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यांची ही भूमिका मान्य करत मॅटचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एच. जोशी आणि सदस्य प्रविण दीक्षित यांनी सरकारी नोकरीत पदोन्नतीत आरक्षणाचा कायदाच नसताना, दिलेलं आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत 154 प्रशिक्षणार्थींना पोलिस उपनिरीक्षपदी देण्यात आलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.

मात्र खात्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने निवड होऊनही, आमची निवड पदोन्नतीने झाल्याचं परिपत्रक का काढलं? असा सवाल 154 उमेदवाराचा आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ पावलं उचलावीत, अशी विनंती या उमेदवारांनी केली आहे.महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांमध्ये प्रशिक्षणामध्ये दुसरा आलेल्या उमेदवाराचाही समावेश आहे.

परीक्षेत पास होऊनही मूळ पदावर का पाठवलं?

नाशिकमध्ये नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमीमार्फत घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात नियुक्ती रद्द करुन मूळपदावर पाठवलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुन्हा मूळ पदावर का पाठवलं असा प्रश्न या उमेदवारांचा आहे.मॅटने निकाल देताना सरकारसमोर दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय 154 जणांना प्रतीक्षेवर ठेवायचं किंवा मूळ पदावर पाठवायचं. मात्र सरकारने टोकाची भूमिका घेत आम्हाला मूळ पदावर पाठवलं. मूळ पदावरच पाठवायचं होतं, मग प्रशिक्षण देऊन परीक्षा का घेतली?या नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा काय उपयोग झाला? सरकारने प्रशिक्षणादरम्यान एवढा पैसा आणि मनुष्यबळ खर्ची का घातलं? असे प्रश्न या उमेदवारांनी उपस्थित केले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत