2019 मध्ये ज्येष्ठ भाजपा नेत्यांना येणार ‘अच्छे दिन’; अमित शहांनी दिले संकेत

नवी दिल्ली:रायगड माझा 

  पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक भाजपामधील वरिष्ठ नेत्यांसाठी नवसंजीवनी ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अमित शहांनी अनौपचारिकपणे या गोष्टीचे संकेत दिले. त्याआधी भाजपाने वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढवू नये, असा नियम आखला होता. त्यामुळे आधीच मार्गदर्शक मंडळात गेलेल्या वरिष्ठ नेत्यांना यापुढे लोकसभेतही जागा मिळणार नव्हती. मात्र या नियमात बदल करण्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे अडगळीत गेलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना 2019 मध्ये अच्छे दिन येऊ शकतात.

काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये झालेल्या एच. डी. देवेगौडा यांच्या शपथविधीत सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले होते. यानंतर उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सर्व विरोधकांनी भाजपाविरोधात एकत्र येत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अमित शहांकडून सुरू आहे. त्यामुळेच 75 वर्ष पूर्ण केलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ शकते, असे संकेत शहांनी दिले. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शत्रुघ्न सिन्हा, करिया मुंडा आणि सुमित्रा महाजन यांच्यासारख्यांना वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळेल.

गेल्या आठवड्यात देशभरातील 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये लोकसभेच्या 2 आणि विधानसभेची 1 जागा सोडल्यास इतर सर्वच ठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला. कैराना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपानं प्रतिष्ठेची केली होती. भाजपा नेते हुकूम सिंह यांच्या निधनानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजपाने त्यांच्या मुलीला मैदानात उतरवले होते. मात्र सहानुभूतीची मते मिळूनही विरोधकांच्या एकजुटीपुढे भाजपाचा निभाव लागला नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याचे संकेत शहांनी दिले आहेत.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत