2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार-उद्धव ठाकरे

 

बीड : रायगड माझा वृत्त 

‘जनतेने सरकारच्या दारात नव्हे तर सरकारने जनतेच्या दारात आले पाहिजे हा शिवसेनाप्रमुखांचा दंडक होता. ही खरी लोकशाही, ही खरी शिवशाही, तीच लोकशाही मला अभिप्रेत आहे. थापाडे सरकार आता नको, तुमच्यासाठी, महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रयतेचे राज्य आले पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सत्तेसाठी वापर करणाऱ्यांना रयतेच्या राज्याचा विसर पडला आहे. शिवसैनिकांनो वङ्कामुठ आवळा. घराघरात, गावागावात जा. थापाड्या सरकारचे कारनामे सांगा, जे जाहिरातीत सांगितले होते ते तुमच्या पदरात पडले का हे विचारा. बस्स झाले आता. 2019 चा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, महाराष्ट्राच्या विधीमंडळावरच काय दिल्लीच्या तख्तावरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये व्यक्त केला.

सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच, उद्धव ठाकरे यांनी फटकारले

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या गटप्रमुख आणि बुथप्रमुखांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडमध्ये दाखल झाले होते. मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आज जो शिवसैनिकांचा जल्लोष दिसत आहे. तो मैदानात उतरल्यावर दिसायला हवा. आज मी बीडमध्ये तुम्हाला चावी मारायला नाही तर चार्ज करायला आलो आहे. महाराष्ट्राच्या विंधीमंडळावर तर भगवा फडकावयाचाच आहे. दिल्लीचे तख्तही काबीज करायचे आहे. शिवसैनिकांनो वङ्कामुठ आवळा. हातात भगवा घ्या आणि कामाला लागा. घराघरात जा. या नालायक सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचा. 2014 ला जी आश्वासने दिली होती. ज्या जाहिराती दाखवल्या होत्या. त्या लोकापर्यंत मांडा. हे काम बुथप्रमुख आणि गटप्रमुखच करू शकतो. लोकांमध्ये सरकारच्या विरोधामध्ये चीड आहे. सरकारने केलेल्या विश्वासघाताचा पाढा जनतेसमोर वाचून दाखवा असे आवाहन करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला.

सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या हाती दिला आसूड

आपल्या भाषणामध्ये बोलताना पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्ताच मी दुष्काळी भागाला भेट देवून आलो आहे. पिके हातची गेली आहे. शेतकरी हाताश आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. जिकडे तिकडे किड लागली आहे. ही किड दूर करण्याचे काम आता आपल्यालाच हाती घ्यावे लागणार. कारण सत्तेवर बसलेल्या सरकारला जनतेचा दु:ख समजत नाही. माझा शेतकरी आणि सामान्य माणूस दुष्काळामध्ये होरपळत असताना सरकार मात्र कागदी घोडे नाचवत आहे. दुष्काळ पाहणीसाठी पथके पाठवत आहे. यांची पथके येणार, पाहणी करून जाणार त्यानंतर दुष्काळ जाहीर होणार तोपर्यंत माझा शेतकरी मरणाच्या खाईत लोटल्या जाणार आहे. ही नाटके बंद करा, त्या कर्नाटक सरकारने अटी आणि नियम बाजूला सारून दुष्काळ जाहीर केला आणि थेट उपाययोजना सुरू केल्या. हा असा निर्णय आपल्याकडे केव्हा होणार, जे राज्यात चालू तेच केंद्रात सुरू आहे. देशातले अनेक शेतकरी आपले प्रश्न घेवून दिल्लीमध्ये गेले. तर तिकडेही तेच एकही मंत्री त्यांना भेटण्यासाठी गेला नाही. उलट त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडले. त्यांना बदडण्याचे काम केले. आरे काय हे, असले कसे सरकार, शिवसेनाप्रमुखांचा असा दंडक होता लोक आपल्याकडे नाही तर सरकार लोकांकडे गेले पाहिजे याला म्हणतात लोकशाही. याला म्हणतात शिवशाही. शिवाजी महाराजांचे मतासाठी नाव घ्यायचे, आशिर्वाद मागायचा आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांवर अन्याय आणि अत्याचार करायचा. राज्यातले आणि वेंâद्रातले सरकार फक्त आणि फक्त फेकू आहे असे म्हणत त्यांनी फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.

तसेच, ‘शिवसेनाप्रमुखांनी एकदा प्रमोद महाजनांना बोलताना म्हटले होते की, हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येवून देशात हिंदूचे सरकार यायला हवे. तेव्हा महाजनांनी हे शक्य नाही असे म्हटले होते. मात्र आज शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेली ही गोष्ट खरी ठरली. हिंदुत्वाला मानणारे सरकार केंद्रामध्ये अस्तित्वात आले. 30 वर्षानंतर मजबूत सरकार दिल्लीत बसले. हा चमत्कारच होय. आपणही या सरकारसोबत होतो. केवळ आणि केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. पण काय मिळालं देशाला, जनतेला आणि तुम्हा आम्हाला. निवडणूक काळामध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट नोटबंदी, जीएसटी, दरवाढ करून ठिकठिकाणी नागवण्याचे काम झाले, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला.

‘हिंदुत्व म्हणणाऱ्या या सरकारला जाऊन विचारा काय झाले राम मंदिरचे, अनेक पिढ्या आल्या, गेल्या अजून किती पिढ्या वाट बघणार. म्हणे प्रकरण कोर्टात आहे. मी कोर्टाचा मान राखतो पण कदाचित न्यायालयाने राम मंदिर होणार नाही असा निर्णय दिला तर काय करणार आपण. राम मंदिरासाठी कायदा करा, राम मंदिर झालं पाहिजे. आम्ही जे बोलतो तेच मोहन भागवत बोलत आहेत. आता म्हणे गोरगरिबांना 2022 पर्यंत घरे देणार. थापाडे आहेत सगळे. म्हणजे आपण सर्वांनी 2019 च्या निवडणुकीत यांना मते द्यायची आणि नंतर त्यांनी आपल्याला घरे द्यायची. विश्वास आहे तुमचा यावर, या सरकारच्या खोट्या जाहिराती बघा चाळून काय लागले आपल्या हाताला’, असे म्हणत केंद्र आणि मोदी सरकारवर आसूड ओढला.

माझ्या वडिलांनी खरे बोलायचे शिकवले
‘मी आज तुमच्याशी जे बोलत आहे ते मनातून बोलत आहे. मी खोटं बोलत नाही. माझ्या वडिलांनी मला खरे बोलायचे शिकवले आहे. त्याच्यामुळे थापा मारणे माझ्या रक्तात नाही. मी जे बोलेल तेच करून दाखवेल, आज सांगतो मी आयोध्येला जाणार, मी 2019 ला शिवसेनेचेच मुख्यमंत्री करून दाखवणार’, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे
‘आम्ही कोरड्या मनाने राजकारण करणाऱ्यापैकी नाहीत. आज आम्हाला स्व. गोपीनाथराव मुंडेंची आठवण येत आहे. त्यांच्या प्रेमापोटी आम्ही आमचा एक एक मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला पण आता नाही बीड जिल्ह्यातील सगळ्या विधानसभा मतदार संघावर भगवा पाहिजे. कारण मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे. ते तुमच्यासाठी, ते राज्य उभारण्यासाठी, तुम्हाला काहीतरी देण्यासाठी, जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल तेव्हा बीडमधूनही शिवसेनेचे सगळे आमदार निवडून आले पाहिजेत असा शब्द मी तुम्हाला मागत आहे आणि त्यासाठी आता कामाला लागा’, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत