शिक्षक, पदवीधरच्या चार जागांसाठी ८ जूनला मतदान

मुंबई : रायगड माझा 

नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर या विधान परिषदेच्या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला. त्यानुसार या मतदारसंघात ८ जून रोजी मतदान होत असून १२ जूनला मतमोजणी होणार आहे.

शिवसेना आमदार व राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर), राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे (कोकण पदवीधर), जनता दल युनायटेडचे कपिल पाटील (मुंबई शिक्षक)आणि नाशिकचे अपक्ष सदस्य प्रा. डाॅ. अपूर्व हिरे (नाशिक विभाग शिक्षक) यांची ८ जुलै २०१८ रोजी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या चारही जागांसाठी २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. २५ मे रोजी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान अाहे. बुधवार, १२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपूर्व हिरे या वेळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हिरे या जागी उभे राहण्याची शक्यता नाही. कपिल पाटील, निरंजन डावखरे या विद्यमान सदस्यांची त्याच मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दीपक सावंत यांना शिवसेनेतून विरोध आहे. मात्र ते विद्यमान मंत्री असल्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असा अंदाज आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.