रायगड जिल्ह्यात टँकरने ३६ गावे, १६५ वाड्यांना पाणीपुरवठा

अलिबाग : रायगड माझा वृत्त 

वाढत्या उन्हाळ्याबरोबर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष झपाट्याने वाढत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत आहे. जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाईग्रस्त गाव-वाड्या आराखड्यानुसार जिल्ह्यात ५०८ गावे आणि १ हजार ३०२ वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने या सर्व ठिकाणी २० टँकर्सच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सद्यस्थितीतील तीव्र पाणीटंचाईग्रस्त ३६ गावे आणि १६५ वाड्यांपैकी सर्वाधिक २१ गावे आणि ६५ वाड्या एकट्या पेण तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पोलादपूरमध्ये १० गावे व ७१ वाड्या, महाडमध्ये २ गावे व १७ वाड्या, कर्जतमध्ये ३ गावे व ४ वाड्या, रोहा व माणगाव तालुक्यात प्रत्येकी दोन वाड्या आणि श्रीवर्धन तालुक्यात चार वाड्यांमध्ये ही तीव्र पाणीटंचाई आहे.

टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच विंधण विहिरी करून गावांत पाणी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ७४ गावे व २२१ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात येत आहेत. जलस्रोत बळकटीकरण योजनेबरोबरच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेतून तलाव, बंधारे व धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकून शेतजमिनी कसदार करण्याच्या कामास जिल्ह्यात गती प्राप्त झाली आहे.
गतवर्षी जलयुक्त शिवाराची कामे यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील १० गावे संपूर्ण पाणीटंचाईमुक्त झाल्याने यंदा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स द्यावे लागले नसल्याचे सूर्यवंशी यांनी पुढे सांगितले. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कोकणचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत करण्यात आला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाउंडेशनचे प्रमुख अमीर खान यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या सभेत जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी रायगडमधील पाणीटंचाई लक्षात आणून दिले.

त्यानंतर रायगडमध्ये प्री-वॉटर कपचे आयोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांतील १४ गावांमध्ये ‘प्री-वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात या सर्व गावांतील ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले आहेत. आगामी वर्षी रायगडचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पूर्णपणे असेल, अशी माहिती सूर्यवंशी यांनी पुढे दिली.

पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ‘झिंक टँक’ संकल्पना

जिल्ह्यात यंदा ‘झिंक टँक’ संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७५ वाड्यांमध्ये या झिंक टँक बसविणे प्रस्तावित असून, त्या योगे या वाड्यांमधील उन्हाळी पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या वाडीमध्ये ‘झिंक टँक’ बसविण्यात येईल. त्यामध्ये पावसाळ््यात पावसाचे पडणारे पाणी साठविण्यात येईल. संपूर्ण उन्हाळ््याच्या काळात एक हजार लोकवस्तीला पुरेल इतके पाणी साठविण्याची क्षमता या झिंक टँकची आहे. जलशुद्धीकरण व्यवस्थेतून हे पाणी वाडीवर उपलब्ध होणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत