आठवलेंवर भाजप नेते नाराज

 नवी दिल्ली : रायगड माझा 

भीमा-कोरेगावमध्ये हल्ले आंबेडकरी जनतेवर झाले होते, असे सांगतानाच त्या विरोधात झालेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये आणि एल्गार परिषदेतही नक्षलवादी कुणीच नव्हते, असे रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परखडपणे नुकतेच सांगितले. मात्र त्यांची ही भूमिका भाजप नेत्यांना रुचलेली दिसत नाही. भाजप अध्यक्ष अमित शहा यावरून नाराज झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आठवले यांच्याकडे खुलासा मागण्याचे निर्देश दिलेत, असे सूत्रांनी सांगितले.

पुण्यातील एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभाग असलेले सुधीर ढवळे यांच्यासहित पाच नक्षलवाद्यांना नुकतीच अटक झाली आहे. तसेच त्यांच्यातील पत्रव्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघड झाल्याचा दावा पोलिसांकडून केला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आठवले यांच्या वक्तव्याकडे पाहत असल्याने पक्षाच्या गोटात नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनच्या दौऱयावर निघण्यापूर्वी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आठवले यांच्या खुर्चीवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

चुकीचे काय बोललो?

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे ज्यांच्या विरोधात सापडले आहेत त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असे निक्षून सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील कटाचाही आपण धिक्कारच केला आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. चुकीचे काही कुठे बोललो आहे, असा सवाल त्यांनी केला.  आंबेडकरवादी लोक हे नक्षलवादी असू शकत नाहीत आणि नक्षलवादी हे कधीही आंबेडकरवादी असू शकत नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, संशयित नक्षलवादी म्हणून सच्चा आंबेडकरी कार्यकर्त्यांना डांबले गेले तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, असेही आपण सांगितले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत