5 जी’चे आगमन; नव्या वर्षात फोल्डेबल स्मार्टफोन

लंडन : रायगड माझा वृत्त 

नव्या वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक थक्क करणार्‍या घडामोडी दिसून येऊ शकतात. फोल्डेबल स्मार्टफोनसारखी अनेक अद्ययावत गॅझेटस् लोकांच्या हाती येतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणेही लक्ष्यवेधी असतील. अनेक प्रकारचे रोबो या वर्षात लोकांचे लक्ष वेधून घेतील. 5 जी, क्लाऊट कम्प्युटिंगचाही बोलबाला यावर्षी होईल.

2018 मध्येच रोयल कंपनीने जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘फ्लेक्सपाय’ लाँच केला होता. त्यानंतर सॅमसंगनेही आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनचे प्रोटोटाईप सादर केले. हा फोन आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लाँच केला जाईल. सॅमसंगशिवाय हुवावे, एलजी, ओप्पो आणि विवोसह अनेक स्मार्टफोन कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकतात. 5 जी कनेक्टिव्हिटीबाबत जगभरात वेगाने काम सुरू आहे आणि या नव्या वर्षात जगाला पहिला 5 जी फोन मिळेल. सॅमसंग आणि वेरिजोनचा पहिला 5 जी स्मार्टफोन जूनमध्ये लाँच होऊ शकतो. याशिवाय वनप्लस, श्याओमी, विवो, ओप्पो आणि हुवावेही 5 जी फोनबाबत काम करीत आहे. 5 जी आल्यानंतर इंटरनेटचा वेग शंभर पटीने अधिक वाढेल, असे मानले जात आहे.

अर्थात भारतात ते कधी येणार, हा प्रश्‍नच आहे! नव्या वर्षात कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणांची व्याप्ती वाढेल. आरोग्य, सायबर सिक्युरिटी, सपोर्ट सर्व्हिस, कृषी, वाहतूक आदी अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढेल. अनेक कंपन्या ड्रोन तंत्रज्ञानावरही नवे काम करीत असून नव्या वर्षात याबाबतही अधिक सुधारणा दिसून येईल. सध्या रिअ‍ॅलिस्टिक रोबोंचेही चलन वाढले असून नव्या वर्षात माणसासारखे दिसणारे, वागणारे, मानवी भाषा समजणारे व बोलणारे रोबो पाहायला मिळतील. मायक्रोसॉफ्ट एज्योर, अमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि गुगल क्लाउटसारख्या क्लाऊड सर्व्हीसेसकडे कंपन्यांचा कल वाढेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत