BCCI करणार पाक क्रिकेट संघावर बहिष्काराची मागणी

 

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरही घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी करणारे पत्रच सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने (सीओए)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नावे लिहिले आहे. मात्र, हे पत्र शशांक मनोहर यांना पाठवायचे किंवा कसे याबाबतचा निर्णय प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय हे घेणार आहेत.

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी या पत्राचा मजकूर लिहिला असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान सतत आपली भूमी दहशतवाद्यांना वापरू देत आहे. त्यांना मदत करत आहे. आणि भारत मात्र या दहशतवादाविरुद्ध लढत आहे. भारतात पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे मत आहे आणि भारत दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड करू इच्छित नाही, असा मजकूर या ई-मेलमध्ये लिहिण्यात आला आहे.

भारतीय संघाचा १६ जूनला मँचेस्टर येथे पाकविरुद्ध सामना होणार आहे. सरकारला जर हा सामना होऊ नये असे वाटत असल्यास हा सामना होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. मात्र, भारत हा सामना खेळला नाही, तर पाकिस्तानला पूर्ण गूण मिळतील आणि भारतीय संघाला नुकसान होईल, असे मत अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

बहिष्काराची मागणी औचित्याची- रविशंकर प्रसाद
आगामी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा ही मागणी काही अंशी औचित्यपूर्ण आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेले असल्याने बहिष्काराचा मुद्दा योग्यच असल्याचे प्रसाद म्हणाले.

पाकिस्तान संघावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असली, तरी १६ जूनला होणाऱ्या सामन्यासाठी २५००० दर्शकक्षमता असणाऱ्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये तिकिटांसाठी तब्बल ४ लाखांहून अधिक लोकांनी तिकिटांची मागणी केली आहे.

मंडळाने छायाचित्रे हटवली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने आपल्या मुंबईतील मुख्यालयातून पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित छायाचित्रे आणि स्मृतिचिन्हे हटवली आहेत. भारतीय क्रिकेट क्लबसह अनेक राज्य क्रिकेट संघांनी आपापल्या कार्यालयांमधून पाकिस्तानशी संबंधित छायाचित्रे हटवल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हिसीएने) देखील नागपूर स्टेडियममधून पाकशी संबंधित छायाचित्रे हटवली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत