भारत बंद: ‘देशाची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात’- शरद पवार

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी जी पावलं उचलायला हवी होती, ती उचलली गेली नाहीत. सध्याचं सरकार जनविरोधी असून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यानेच जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली.

विरोधकांनी रामलिला मैदानावर सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला संबोधताना शरद पवारांनी हा हल्ला चढवला. ३० ते ४० वर्षात काहीच झालं नाही. चार वर्षातच आम्ही बहादुरी गाजवली असं या सरकारचं म्हणणं आहे. खरं आहे. या सरकारने चार वर्षात मोठी बहादुरी केलीय. या सरकारने चार वर्षात गॅसचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले ही बहादुरी केली. इंधन दर गगनाला नेऊन ठेवले ही बहादुरी केली. आंतराराष्ट्रीय बाजारात रुपया घसरला ही बहादुरी केली, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. आपण सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलो आहोत, हे सत्ताधाऱ्यांनी मान्य केलंच पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

चाळीस वर्षात काहीच झालं नाही, असं भाजपचं म्हणणं असतं. पण विरोधी पक्षात असताना स्वत: अटलबिहारी वाजपेयी यांनीच भाजपला सुनावले होते. चाळीस-पन्नास वर्षात काहीच झालं नाही असं म्हणणं म्हणजे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचा अवमान आहे. रोजगार वाढल्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार आहे, असं वाजपेयींनी सुनावलं होतं, याची आठवणही त्यांनी करून दिली. हे सरकार जनविरोधी असल्याचं लोकांना पटवून दिलं पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्याचं पटवून दिलं तरच सत्तांतर घडून येईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत