Bigg Boss 11 : ‘बिग बॉस’चा शेजारी होणार हसीना पारकरचा जावई

हसीना पारकर हे नाव आता नवं नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमची बहिण म्हणून ती ओळखली जाते. तिच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा एक चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासूनच हसीना पारकरचं जग नेमकं कसं असेल याचा प्रेक्षकांना काही प्रमाणात अंदाज आला. आता तर तिच्या कुटुंबातील एक व्यक्ती छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकेकाळी मुंबईवर दबदबा असणाऱ्या हसीनाचा जावई ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वात सहभागी होणार आहे.

‘कलर्स’ वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘बिग बॉस ११’चा एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या विभागात झुबैर खानही ‘बिग बॉस’च्या घरात येणार असल्याचं पाहायला मिळतंय. झुबैरचं नुसतं नाव ऐकलं तर कोणालाच त्याच्या कुटुंबाची माहिती लक्षात येणार नाही. पण, त्याचं नाव समोर आल्यानंतर या व्हिडिओमध्ये अगदी थोड्याच शब्दांत तो स्वत:ची ओळख करुन देत आहे. ‘माझं लग्न जरी अंडरवर्ल्डशी संबंध असेलेल्या कुटुंबात झालं असलं तरीही मी स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे’, असं तो या प्रोमोमध्ये म्हणताना दिसतोय.

‘बॉलिवूड लाईफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, झुबैर ‘त्या’ सर्व संबंधापासून दूर असून, तो निर्मिती क्षेत्रात सक्रिय आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत झुबैर म्हणाला होता, ‘मी त्या परिसरातून १९९७ मध्येच बाहेर पडलो. गेल्या १५ वर्षांपासून मी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. माझी ‘गार्बेज’ नावाची निर्मिती संस्था असून, आम्ही जाहिराती तयार करतो. यामध्ये मला चंद्रपाल सिंग यांची साथ आहे, जे सध्या सहायक निर्माते म्हणून सक्रिय आहेत.’ नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व आहे असं सांगणारा झुबैर नेमका आहे तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत