GSAT-31 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

फ्रेंच गुएना : रायगड माझा ऑनलाईन 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ४०व्या GSAT-31 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण झाले. फ्रेंच गुएना येथील युरोपीय अवकाश केंद्रातून भारतीय वेळेनुसार रात्री २ वाजून ३१ मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावला. उड्डाणानंतर ४२ मिनिटांनी म्हणजेच ३: १४ वाजता हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थिरावला. हे प्रक्षेपण एरियनस्पेसच्या एरियन-५ रॉकेटद्वारे करण्यात आले.

GSAT-31 या उपग्रहाचे वजन २५३५ किलो इतके आहे. हा उपग्रह पुढील १५ वर्षे आपली सेवा देणार आहे. हा उपग्रह भारताच्या जुन्या इनसॅट-४सीआर या उपग्रहाची जागा घेईल. आजचे प्रक्षेपण अतिशय उत्तमरित्या पार पडले, अशी माहिती प्रक्षेपणस्थळी उपस्थित सतीश धवन अवकाश केंद्राचे संचालक एस. पांडियन यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी एरियनस्पेस आणि इस्रोच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जुलैमध्ये GSAT-30 चेही होणार प्रक्षेपण

याच वर्षी जून-जुलै दरम्यान GSAT-30 या आणखी एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हे प्रक्षेपण एरियनस्पेसमधूनच होणार आहे, अशी माहिती पांडियन यांनी दिली. एरियनस्पेसशी आमचा संबंध १९८१ पासूनचा आहे. त्यावेळी आम्ही एरियन फ्लाइट L03ने भारताचा प्रायोगिक उपग्रह APPLE चे प्रक्षेपण केले होते, असेही पांडियन म्हणाले.

एरियनद्वारे भारतासाठी करण्यात आलेले हे २३वे यशस्वी उड्डाण असल्याचे एरियनस्पेसचे सीईओ स्टीफन इस्रायल यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी GSAT-11 या भारताच्या सर्वात जड उपग्रहाचे प्रक्षेपण आम्हीच केले होते, असेही इस्रायल म्हणाले. या उपग्रहाचे वजन ५८५४ किलो इतको होते.

GSAT-31 या उपग्रहाचे वजन तुलनेने कमीच आहे. तरी देखील त्याच्या प्रक्षेपणासाठी एरियनस्पेसची मदत घेण्यात आली. कारण हे प्रक्षेपण घाईत करण्यात आले. GSAT-31 केवळ GSLB माक-३द्वारे रॉकेटचा वापर करत प्रक्षेपित केले जाऊ शकत होते, मात्र ही यंत्रणा आधीच चंद्रयान-२ साठी आरक्षित ठेवण्यात आली आहे, अशी माहिती इस्रायल यांनी दिली. आमच्याकडे GSAT-31साठी कोणतेही अतिरिक्त रॉकेट नव्हते असेही इस्रायल म्हणाले.

यासाठी होणार GSAT-31चा वापर 

GSAT-31 उपग्रहाचा वापर व्हिसॅट नेटवर्क, टिव्ही अपलिंक, डिजिटल सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सेवा आणि इतर अनेक सेवांसाठी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, हा उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपोंडरच्या मदतीने अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंदी महासागरासारख्या विशाल समुद्री क्षेत्रावर संचार सुविधेसाठी विस्तृत असे बीम कव्हरेज प्रदान करणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत