Kerala Floods: महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात, पुण्यातून जाणार प्यायचं पाणी

पुणे : रायगड माझा वृत्त 

केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज तब्बल सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाईल.

drinking water supply for kerala flood affected areas from pune | Kerala Floods: केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला, पुण्यातून जाणार प्यायचं पाणी

केरळ राज्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारकडून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. त्यामध्ये भारतीय रेल्वेनेही हातभार लावला आहे. रेल्वे कडून ठिकठिकाणाहून केरळला पिण्याचे पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातूनही आज ७ लाख लिटर पाणी रेल्वेने पाठविले जाणार आहे. घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वेच्या १४ टँक वॅगनमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत पाणी भरण्याचे काम पूर्ण होईल. रेल्वेकडे उपलब्ध असलेले तसेच फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी आणलेले पाणी वॅगनमध्ये भरले जात आहे. एका वॅगनमध्ये सुमारे ५० हजार लिटर पाणी भरले जाते.

रतलाम येथूनही १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे २९ वॅगन दुपारी १ वाजता पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर एकूण ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन ही विशेष रेल्वे दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होईल. केरळ मधील कयनकुलम जंक्शनवर हे पाणी पोहचवले जाईल. पुण्यातील रेल्वे च्या अधिकारी व कर्मचार्यांकडून काल रात्रीपासून यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत