McDonald चे CEO स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची हकालपट्टी

न्यूयॉर्क : महाराष्ट्र News 24

मॅकडोनाल्डने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची हकालपट्टी केली आहे. कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे स्टीव्ह यांनी काही चुकीचे निर्णय घेतले, असाही ठपका संचालकीय मंडळाकडून त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत स्टीव्ह ईस्टरब्रुक हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं उघड झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यानंतर स्टीव्ह यांनी मंडळातील सदस्यपदाचाही राजीनामा दिला आणि आपण चूक केली असल्याचंही मान्य केलं. “आपण कायम कंपनीच्या हितासाठीच काम केलं आहे, पण संचालकीय मंडळाचा निर्णय योग्य असून मी जाण्याची वेळ आली आहे,” असा मेल स्टीव्ह यांनी कर्मचाऱ्यांना केला. स्टीव्ह यांचं कृत्य कंपनीच्या धोरणांच्या विरोधात असल्यामुळे ही कारवाई करत असल्याचं कंपनीच्या मंडळाने सांगितलं. ५२ वर्षीय स्टीव्ह २०१५ पासून सीईओ म्हणून काम करत होते.

अमेरिकेतील कॉर्पोरेट विश्वात अशा अनेक घटना समोर आल्या, ज्यात रिलेशनशीपमुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पद सोडावं लागलं. सोशल मीडियावर #MeToo मोहिम सुरु असताना विविध कंपन्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडताळणीही केली. जून २०१८ मध्ये इंटेल कॉर्पचे सीईओ ब्रायन यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. ब्रायन हे कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये होते. ईस्टरब्रुक यांच्यानंतर क्रिस केंपिजिन्स्की यांना मॅकडोनाल्ड यूएसएचे सीईओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
केंपजिन्स्की यांनी पदभार स्वीकारताना ईस्टरब्रुक यांचे आभार मानले. ईस्टरब्रुक यांची कामे पुढे चालू ठेवत काम करत राहिन, अशी प्रतिक्रिया केंपजिन्स्की यांनी दिली. केंपजिन्स्की कंपनीच्या धोरणांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत, असं मॅकडीचे चेअरमन एनरिक हर्नांडेज यांनी म्हटलं आहे. मॅकडीचं मुख्यालय अमेरिकेतील शिकागोमध्ये असून कंपनीचे ४० वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहेत. कंपनीने ईस्टरब्रूक यांच्याविषयीची अधिक माहिती जारी केलेली नाही.

अमेरिकेत २०१५ मध्ये मॅकडी व्यावसायिकदृष्ट्या संघर्ष करत असताना स्टीव्ह यांच्याकडे सीईओ म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी कंपनीचे शेअर्सही कोसळत होते, तर ग्राहकांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पण स्टीव्ह यांच्या नेतृत्त्वात कंपनीने पुन्हा एकदा भरारी घेतली आणि आपलं स्थान मजबूत केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत