PUBGमुळे ढासळली मानसिक स्थिती; तरुणाच्या नावामुळे घटना जास्त चर्चेत…

चाकण: महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

पबजी (PUBG) या गेम मुळे आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. चाकण मध्ये याचा प्रत्यय आला आहे. पबजी गेम मुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर चाकण पोलिस पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेपेक्षा त्या तरुणाच्या नावामुळे ही घटना जास्त चर्चेत आली आहे.

संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची तयारी सुरू केली आहे. अजित शिवाजी पवार असे या तरुणाचे नाव असून, सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे. सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या २५ वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. अजित गावात पबजी गेम मधील सगळ्या अॅक्शन करत गावात फिरत होता. तसेच तो गावात नागिरकांना दगडं मारत फिरत होता. अजित मुळचा टेंबुर्णी, सोलापूर येथील आहे, चाकणमधील नागरिकांना त्याला पोलिस ठाण्यात आणलं आहे. त्याच्या वडिलांना या प्रकाराची माहिती देण्यात आल्याचे चाकणचे पोलिस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांनी दिली. स्वतःचा मोबाईल त्यानं स्वतः दगडांनी फोडला. मित्रांना भेटून म्हणाला, मला दोनशे माणसे मारायला आली आहेत. अजित रस्त्यांवर मुलांच्या सायकलींवर बसायचा आणि त्यांना त्रास देत होता. एका मिनिटांत अख्खी बिल्डिंग उडवून टाकतो, असं म्हणायचा, अशी माहिती त्याच्या मित्रांनी चाकण पोलिस ठाण्याबाहेर मीडियाशी बोलताना दिली. गेल्या काही दिवसांपासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. पण, अद्याप तरी तशी बंदी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरू असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेमपासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. एवढंच नव्हे तर अनेक जण हे या गेमच्या आहारी गेले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत