RK Studio Fire : आर. के. स्टुडिओ आग प्रकरणी कपूर कुटुंबियांना कारणे दाखवा नोटीस

चित्रपटसृष्टीत अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या आर. के. स्टुडिओला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. राज कपूर यांच्या चित्रपट कारकिर्दीचा अगदी जवळून आढावा घेतलेल्या या वास्तूचं आगीमध्ये बरंच नुकसान झालं. कपूर कुटुंबियांनी याप्रकरणी दु:खही व्यक्त केलं. पण, स्टुडिओला लागलेल्या आगप्रकरणी आता कपूर कुटुंबियांच्याच अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण, अग्निशामक विभागाने कपूर त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

अग्निशामक विभागाच्या अहवालानुसार अग्निशामक केंद्रालाही आग लागल्याची माहिती उशीरा देण्यात आली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे जरी आग लागली असली तरीही ती निष्काळजीपणामुळेच जास्त पसरली. तेव्हा आता या घटनेमागचं नेमकं सत्य काय, अग्निशामक विभागाला बोलवण्यात दिरंगाई का झाली, कोणत्या कारणामुळे इतका वेळ दवडला गेला या सर्व प्रश्नांची उत्तरं आता समोर येणार आहेत.

१६ सप्टेंबरला लागलेल्या आगीत ‘सुपर डान्सर’ या रिअॅलिटी शोच्या सेटचं बरंच नुकसान झालं. शनिवार असल्यामुळे त्या दिवशी स्टुडिओमध्ये कोणीच नव्हतं. एकंदर परिस्थिती पाहता आता ही आग आता अनेकांच्याच मनात प्रश्नांचा काहूर माजवू लागली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर ऋषी कपूर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. ‘चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांना, दर्जेदार चित्रपटांना घडवणाऱ्या या वास्तूचं अशा प्रकारे नुकसान होणं हे फक्त कपूर कुटुंबियांसाठीच तोट्याचं नसून, चित्रपटसृष्टीलाही याचा फटका बसला आहे’, असं ते मुलाखतीत म्हणाले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे काही कळण्याआधीच स्टुडिओमध्ये संग्रही ठेवण्यात आलेल्या बऱ्याच वस्तू आगीत जळून गेल्या. ज्यामध्ये ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात राज कपूर यांनी वापरलेला मुखवटा, नर्गिस यांनी विविध चित्रपटांमध्ये वापरलेले कपडे आणि ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटात अभिनेत्री पद्मिनी यांनी वापरलेले दागिने सर्व गोष्टी जळून गेल्या होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत