WhatsAppवर वादग्रस्त मेसेज फॉरवर्ड करीत असाल तर सावधान!

रायगड माझा वृत्त :

Related image

WhatsApp या मेसेजिंग अॅपमुळे कुठल्याही माहितीच्या प्रसाराला आता वेग आला आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक अफवा, वादग्रस्त आणि आक्षेपार्ह मेसेज याद्वारे फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे समाजातील शांततेचे वातावरण भंग होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता सरकारने अधिक कडक पावले उचलली आहेत. अशा स्वरुपाचे वादग्रस्त मेसेज पाठवणाऱ्यांचे लोकेशन आणि ओळख आता सरकारकडे उपलब्ध होऊ शकणार आहे. अशी माहिती पुरवण्याचे आदेशच केंद्र सरकारने WhatsAppला दिल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.

प्रसाद म्हणाले, आम्हाला खोटे आणि अफवा पसरवणारे मेसेज पाठवणाऱ्यांची माहिती हवी आहे. WhatsAppचे मेसेज डिक्रिप्ट केले जावेत असे आम्हाला वाटत नाही. मात्र, अशा व्यक्तींचे लोकेशन आणि त्यांची ओळख आम्हाला जाणून घ्यायची आहे. कारण, त्यामुळे सरकारला खोट्या मेसेजेसमुळे होणाऱ्या दंगली आणि गु्न्ह्यांवर नियंत्रण मिळवता येईल.

WhatsAppच्या टीमने भारत सरकारला यावर विचार करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp कंपनीवर भारत सरकारकडून खोट्या बातम्या रोखण्यासाठी दबाव वाढत आहे. यासंदर्भात WhatsAppचे उपाध्यक्ष क्रिस डॅनिअल यांच्यासोबत रविशंकर प्रसाद यांची ऑगस्ट महिन्यांत बैठक झाली होती. त्यावेळी भारताने मेसेज पाठवणाऱ्याची ओळख उघड करण्याची केलेली मागणी डॅनिअल यांनी धुडकावली होती.

दरम्यान, गेल्या बैठकीत डॅनिअल यांनी भारतातून येणाऱ्या गंभीर तक्रारींवर काम करण्यासाठी एका तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल जो अमेरिकेतून काम पाहिलं असे सांगितले होते. मात्र, प्रसाद यांनी अशा अधिकाऱ्याची भारतात नियुक्ती असायला हवी, कंपनीला सांगितले होते. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत भारतात एका कंपनीकडे याची जबाबदारी देण्यात येईल असे त्यावेळी डॅनिअल यांनी सांगितले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत